संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. उद्या गुरुवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. येथील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेचा विचार करता भाजपाचे नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती, काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी येथे समझोता करुन नगरसेवक निवडण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सांगितले जात आहे. दुखद घटनेत निवडणूक घेणे योग्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. प्रभाग क्रमांक १३ चे दिवंगत नगरसेवक संजय नष्टी हे काॅंग्रेसचे असले तरी त्यांनी भाजपाची साथसंगत केली होती. त्यामुळे हा प्रभाग काॅंग्रेस-भाजपाचा समजला जात आहे. छाननीनंतर निवडणूक रिंगणात पाच उमेदवार राहिले आहेत. पैकी तिघे भाजपाचे आहेत. त्यामुळे उद्या दोघांना माघार घ्यावी लागणार आहे. निवडणूक रिंगणात फक्त तीन जण राहणार आहेत. त्यामुळे नेतेमंडळींना समझोता घडवून आणाणे सहजसोपे ठरणार आहे. संकेश्वर पालिकेत सत्ता कत्ती गटाची आहे. काॅंग्रेस विरोधी गटाची भूमिका बजावित आहे. मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी चर्चा करुन निवडणुकीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचविण्याबरोबर इर्षेला मुठमाती देण्याचे कार्य करायला हवे आहे. येथे समझोता करताना प्रथम नष्टी परिवाराला प्राधान्य देण्याचे कार्य झाल्यास प्रविण एस. नष्टी यांना नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे. फिप्टी-फिप्टीचा फार्मुला वापरून समझोता झाल्यास सव्वा वर्ष काॅंग्रेसचे ॲड. प्रविण नेसरी यांना सव्वा वर्ष भाजपचे नंदू मुडशी यांना नगरसेवक होता येणार आहे. अडीच वर्षे कालावधीसाठी निवडणूक पेक्षा समझोताच बरा असे जाणकारांचे मत आहे. नेते मंडळींच्या निर्णयावर उद्या निवडणूक होणार की समझोता हे ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta