Thursday , September 19 2024
Breaking News

प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला!

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. येथे भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू शिवपुत्र मुडशी, काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. प्रविण शिवप्पा नेसरी यांचेत अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा सामना होत आहे. त्यामुळे संपूर्ण संकेश्वरकरांचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिलेले दिसत आहे. लढत नंदू विरोधात पुट्टू असली तरी सामना कत्ती विरोधात ए. बी. पाटील यांच्यात होत आहे. आगामी हुक्केरी विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग 13 ची निवडणूक तशी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक समजली जात आहे. त्यामुळे कत्ती गटाने निवडणुकीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे. येथील भाजप उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्या विजयासाठी कत्ती बंधुंनी कंबर कसलेली दिसत आहे. राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखाली नंदू मुडशी यांच्या प्रचाराची रुपरेषा आखून माजी खासदार रमेश कत्ती, हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती, युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, तसेच चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेरली, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गजानन क्वळी, शंकरराव हेगडे, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, पालिकेतील सत्ताधारी कत्ती गटाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवकांनी भाजपाच्या सर्व नेतेमंडळींनी, प्रचारात आघाडी प्रस्थापित करुन दाखविली आहे. येथील प्रत्येक मतदाराचे अमोल मत मिळविण्याचे कार्य केले जात आहे. तसे पाहिले तर पालिकेत कत्ती गटाचे पूर्ण बहुमत आहे. कत्ती बंधुंना आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता संकेश्वरातील कमी मतांची गोळाबेरीज प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीतून करावी लागणार आहे. त्यामुळे येथे भाजपचा उमेदवार विजयी होणे आवश्यक समजले जात आहे. येथे मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती आणि भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार विजय झाला न झाला तरी काँग्रेसचे फार कांहीं नुकसान होणार नाही. येथे भाजपचा उमेदवार विजयी झाला तर कत्तीं बंधूंची इज्जत वाचणार आहे आणि पराभव पत्करावा लागला तर मोठे नुकसान आणि नामुष्की होणार आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीना प्रभाग सांभाळता येत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खळबळ माजविणारी ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक 13 हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तो माजी मंत्री ए. बी. पाटील यांना टिकविता येतो कि नाही. इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. ए. बी. पाटील यांना मानणारे आणि त्यांच्या कार्यावर निष्ठा ठेवणारे लोक येथे असल्याने भाजपाला निवडणूक भारी ठरलेली दिसत आहे. माजी मंत्री ए. बी. पाटील, युवानेते विनयगौडा पाटील, बसनगौडा पाटील, संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, पालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक अ‍ॅड. प्रविण नेसरी यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. येथील निवडणूककरिता प्रभागातील लोकांनी पुट्टू यांची निवड केली आहे. त्यामुळे प्रभागातील लोकांचा इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उद्या शुक्रवार दि. 20 मे 2022 रोजी होणार्‍या मतदानातून स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *