संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर भागात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडू लागल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. लोकांत चोरीच्या घटनांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस चोरांना पकडणेत अपयशी ठरल्याची चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचा दर्जा पोलीस निरीक्षक पदाने वाढला आहे. पण संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांचा दबदबा कांही कोठेच दिसेनासा झाला आहे. कायद्याची भाषा करणाऱ्या पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या अधिकार पदाच्या कालावधीत दिवसाढवळ्या चोरीचे प्रकरण वाढल्याने लोकांत बरीच चर्चा होताना दिसत आहे. चोरांनी सरळ-सरळ पोलिसांना चॅंलेंज देत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या करून पोबारा करताहेत. त्यामुळे संकेश्वरकरांचा विश्वास आता काहीसा खाकी वर्दीवरुन कमी होतांना दिसत आहे. संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता शेतवाडीतील राम किल्लेदार यांच्या घरावर चोरांनी दरोडा घातला. त्याचा तपास लावण्यात पोलिसांना अद्याप यश मिळालेले नसतांना येथील आदर्श नगरमधील जयप्रकाश सावंत यांच्या निवासस्थानी चोरांनी दिवसाढवळ्या ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार, चांदीचे दागिने, रोख पन्नास हजार रुपये घेऊन धाडसी दरोडा घातला.ही घटना ताजी असताना शिवाजी चौकात चोरांनी धूम स्टाईलने एका महिलेचे खंडन हिसकावून पोबारा केला. परवा अंकले रस्ता येथील सावेकर ऑईल मिल जवळ अंगणवाडी सेविका विजयालक्ष्मी राजू चौगुला यांना पोलीस असल्याचे भासवून त्यांच्या अंगावरील पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन, सोन्याच्या बांगड्या घेऊन चोर बाईक वरुन पसार झाले आहेत. गावात ठिकठिकाणी दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे लोकांत चांगलेच भितीदायक वातावरणात निर्माण झालेले दिसत आहे. अंकले रस्ता येथील सावेकर ऑईल मिल जवळ घडलेल्या चोरी प्रकरणातील चोरांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संकेश्वर पोलिसांनी तेथील फुटेज मिळवून चोरांचा तपास चालविला आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा बंद
संकेश्वर पालिकेने पोलिसांच्या मागणीची दखल घेत गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे कार्य केले होते. सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी पालिकेच्या डोळ्यात धूळफेक करीत साधे कॅमेरे बसवून दिल्यामुळे कांहीं कालावधीनंतर कॅमेरे बंद पडले आहेत.त्याची दुरुस्ती करुन देखील फारसा उपयोग होणार नसल्याने आता परत नवीन सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी प्रशासनापुढे ठेवला आहे. खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यानी सीसीटीव्ही कॅमेरासाठी निधी मिळवून देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे लवकरच गावातील प्रमुख ठिकाणी चोरांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत दिसणार आहेत.
संकेश्वर पोलिसांनी “चॅलेंज”स्विकारले
संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी त्यांचे सहकारी चोरांचा छडा लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलीस दिवसाढवळ्या धाडसी चोरी करणाऱ्या चोरांच्या मागावर असून लवकरच चोर गजाआड होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर संकेश्वर पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत चोरीविषयी लोकांत जनजागृती निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. लोकांना विशेष करुन महिलांना सावध करण्याचे काम पोलीस करताहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांनी अंगावर सोन्याचे अलंकार घालून जाण्याचे शक्यतो टाळावे, सोने पाॅलिस करुन देतो असे सांगून फसविण्याऱ्या भामट्यांपासून सावध रहावे. कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. बाहेर गावाला जाताना घराला कुलूप लावून त्याची पोलिसांना कल्पना देण्याचे कार्य केल्यास पोलिसांना बंद घरांवर लक्ष ठेवून चोरीच्या घटना टाळता येतील. संकेश्वर पोलिस अपरिचित लोकांवर नजर ठेवून आहेत. चोरांचा छडा लावण्यासाठी यंगस्टार ग्रुपचे देखील सहकार्य घेतले जात आहे.त्यामुळे लवकरच चोर गजाआड दिसणार आहेत.