

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा निरर्थक प्रयत्न करताहेत. शाळेचे वर्ग ओलेचिंब झाले तरी इकडे संबंधित अधिकारींचे लक्ष कांहीं दिसेनासे झाले आहे. शाळेच्या प्रवेश द्वारा समोर पावसाचे पाणी साचून राहिलेले चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे शालेय मुलांना प्रार्थना देखील शाळेतच करावी लागत आहे. शाळेच्या दुरावस्थेमुळे पालक काळजीत दिसताहेत. पालकांसमोर मोठा जटील प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. मु्लांना शाळेला पाठविले नाहीतर शैक्षणिक नुकसान होणार? शाळेला पाठवायचे म्हणजे मुलांचा जीव धोक्यात? कधी शाळेची कौले मुलांच्या डोक्यावर पडतील याचा नेम नाही. यामुळे शाळेतून मुले घरी येईपर्यंत पालकांना काळजी लागून राहिलेली दिसत आहे.
अंकले ग्रामपंचायतला दाद ना फिर्याद..
राम पोवार म्हणाले अंकले ग्रामपंचायतला दाद ना फिर्याद. शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यातूनच मुलांना शाळेत प्रवेश करावा लागत आहे. शाळेच्या आवारात अंकले पंचायत पेव्हर कधी घालणार कोण जाणे? पंचायतला सांगून देखील कोणीही दाद घायला तयार नाही. शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचून राहिल्याने शालेय मुलांना आता प्रार्थना देखील शाळेतच करावी लागत आहे. शाळेची कौले फुटल्याने पावसाचे पाणी शाळेत दिसत आहे. शाळेचे छत दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मुलांच्या डोक्यावर कौले पडून कांहीं झालं तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शाळेसाठी शिक्षकांनी काय केलं? असा प्रश्न कोणी विचारला तर शिक्षकांची गोची होणार आहे. सरकारी शाळेचा गलेलठ्ठ पगार मिळविणारे शिक्षक फक्त सरकारच्या मदतीचीच वाट पहाणार काय? शिक्षकांचं शाळेसाठी कांहीं देणं-घेण नाही काय? अंकले शाळेच्या छतावरील दहा एक कौले फुटली आहेत. त्यासाठी किती पैसे लागणार होते. तेवढे पैसे शिक्षकांंनी खर्च केले असते तर शाळेची किमान बदनामी तरी वाचली असती.
Belgaum Varta Belgaum Varta