
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज देवशयनी आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. येथील गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गोंधळी गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. भक्तगण रांगेत उभे राहून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेवून पुनित होताना दिसले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी गांधी चौक आणि गोंधळी गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात विधिवत्त पूजनाने विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. गांधी चौक श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्रींचे स्वागत नामदेव शिंपी समाजाचे कृष्णकांत मुळे, दामोदर खटावकर आणि समाज बांधवांनी केले. येथे श्रींच्या हस्ते भक्तगणांना राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.गोंधळी गल्ली विठ्ठल मंदिरात श्रींचे स्वागत संदिप दवडते आणि गोंधळी समाज बांधवांनी केले.
गोंधळी गल्लीतील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसली. गांधी चौक परिसरात सकाळी कांहीं काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे भक्तगणांना अंधारातच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागले. दुपारी दीडच्या दरम्यान विठ्ठल दर्शनासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. मंदिरात भक्तगणांतून विठ्ठल-विठ्ठल जय हरी विठ्ठलचा नामगजर चाललेला दिसला. येथे मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी भक्तगणांना राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप केला. भक्तगणांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी पावसाने विश्रांती घेतलेले चित्र पहावयास मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta