संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी मंत्री ए. बी. पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली दिसत आहे. याविषयी अद्याप तरी ए. बी. पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ए. बी. यांचं उत्तर? काय असणार यांचे औत्सुक्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले दिसत आहे. राजकारणात कोणतीही गोष्ट नक्की नसते. त्यामुळे राजकारणात असेच घडेल हे कांहीं सांगता येत नाही. कर्नाटकात विधानसभेची निवडणूक मध्यावधी होणार असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना दुसरीकडे आतापासूनच उमेदवारांची नावे घोषित होताना दिसत आहेत. माजी मंत्री ए. बी. पाटील हे बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरले तर हुक्केरी मतक्षेत्रात काॅंग्रेसची उमेदवारी कोणाला? हा प्रश्न कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे. हुक्केरीत मंत्री उमेश कत्ती विरोधात काॅंग्रेसची उमेदवारी विजय रवदी, विनयगौडा पाटील, संतोष मुडशी किंवा रेखा चिकोडी यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मंत्री ए. बी. पाटील यांना बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून आखाड्यात उतरविणेची तयारी वीरशैव लिंगायत महासभेचे कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले जात आहे. कारण बेळगांव उत्तर मतक्षेत्रात लिंगायत आणि मुस्लिम मतांचे प्राबल्य असल्याने त्याचा लाभ ए. बी. यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या मतक्षेत्रात भाजपाचे आमदार ॲड. अनिल बेनके कार्यरत आहेत. त्यांनी उत्तर मतक्षेत्रात केलेली विकासकामे लक्षात घेता भाजपाची उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील लढत ॲड.अनिल बेनके विरोधात ॲड. ए. बी. पाटील अशी चुरशीने होण्याचं शक्यता आहे. याविषयी ए. बी. पाटील यांचं “उत्तर” काय असणार कोण जाणे.
Belgaum Varta Belgaum Varta