संकेश्वर (महंमद मोमीन) : रोहिणी पेरा, मोत्याचा तुरा… सांगण्याचे दिवस मागे पडल्याने शेतकरी निसर्गाच्या बदलाचा स्विकार करीत खरीप आणि रब्बी पिके घेतांना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्र काळात खरीपाची पेरणी करण्याचे भाग्य लाभलेले नाही. यंदा तर शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी आद्रा नक्षत्र काळात करावी लागली आहे. रोहिणी नंतर मृगाने देखील दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळा लावून बसला होता. अखेर आद्रा नक्षत्र काळात ७०% शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणीचे काम केले. आद्रा तदनंतर पुर्नवसू तरणा पाऊस खरीपाला पोषख ठरला आहे. त्यामुळे खरीपाची उगवन बऱ्यापैकी झालेली दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थांमध्ये मिळणाऱ्या सोयाबीन -३३५ बियानांंची पेरणी केली आहे. बागायत शेतकऱ्यांनी फुले संगंम केडीएस-७२६ बियानांची पेरणी केली आहे. सध्या बरसत असलेला तुरळक पाऊस खरीपाला थोडासा मारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सोयाबीन पिकात पाने कातरणाऱ्या आळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकरी किटकनाशकाची फवारणी करतांना दिसत आहे. उसाला “हुंगनी”चा प्रादुर्भाव मारक ठरलेला दिसत आहे. सोयाबीनचे उत्पादन चांगले मिळावे यासाठी टाॅनिक चा वापर देखील शेतकरी करतांना दिसत आहेत. सोयाबीन फुलवाढी प्रसंगी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू नये. यासाठी शेतकरी आतापासूनच दक्षता घेतांना दिसत आहेत.