संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर अंबिका नगरला जाणारा रस्ता खड्डेमय बनल्याने या मार्गे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांची, शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागल्याची तक्रार युवा नेते महेश दवडते यांनी केली होती. त्यांनी येथे गटारची सोय नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत असल्याचे तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहिल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पालिकेच्या निर्दशनास आणून दिले होते. त्याची दखल घेऊन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, नगरसेविका सौ. शेवंता कब्बूरी यांनी रस्ता मुरुमीकरण कामाला चालना मिळवून दिलेली दिसत आहे. अंबिका नगर रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे मुरुमने बुजविण्याचे काम केले जात आहे. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेविका सौ. शेवंता कब्बूरी यांनी अंबिका नगर रस्ता मुरुमीकरण कामाला चालना मिळवून दिलेबदल त्यांचे विशेष आभार महेश दवडते यांनी मानले आहेत. अंबिका नगरमध्ये गोंधळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यांची उद्या शुक्रवारी श्री मरगुबाई देवीची यात्रा होत आहे. यात्रेपूर्वी रस्ता मुरुमीकरण करण्यात आल्यामुळे लोकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.