
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूर येथे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते कर्नाटक मराठा समुदाय अभिवृद्धी निगम मंडळाची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांनी मराठा निगमचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण केले. परमपूज्य वेदांतचार्य श्री मंजुनाथ स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उदघाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा निगम वेबसाईटचे लोकार्पण केले. सरकारने मराठा निगम मंडळास शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिलेबद्दल कर्नाटक मराठा समुदाय अभिवृद्धी निगम मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांनी सरकारचे आभार मानले. मुळे यांनी सरकारकडे मराठा समुदायाचा २ अ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. त्याचबरोबर चेन्नगिरी येथील संभाजी महाराज, होदुगिरी येथील शहाजी महाराज समाधी जिर्णोद्धारचे काम हाती घेण्याची मागणी केली. मराठा निगम मंडळाच्या उदघाटन सोहळ्याला मंत्री अश्वथ नारायण, मंत्री शशिकला जोल्ले आमदार लक्ष्मण सवदी, आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, आमदार श्रीनिवास माने, आमदार डॉ. अंजली निंबाळकर, आमदार श्रीमंत पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, महांतेश कवठगीमठ उपस्थित होते. हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांची अनुपस्थिती हुक्केरी मतक्षेत्रातील मराठा समाज बांधवांना चांगलीच जाणवली. त्यामुळे हुक्केरी मराठा समाज अभिवृद्धी संघाच्या सदस्यांतून मंत्री उमेश कत्ती यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्घाटन सोहळ्याला उपस्थितीत हुक्केरी मराठा अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष अप्पा मोरे उपाध्यक्ष सुभाष कासारकर, पुष्पराज माने, संतोष पाटील, सुखदेव मोकाशी, नारायण पाटील यांचा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांनी स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta