Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर पोलिसांनी केवळ तीनच तासात लावला अपहृत साईचा शोध!

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसस्टँड येथे काल मंगळवारी दि. २ रोजी रात्री ८ वाजता ट्यूशनहून घरी परतणाऱ्या कु. साई भास्कर काकडे (वय १४) या मुलाला दोघा अपरिचित व्यक्तींनी गाठले. त्यांनी साईला लवकर चल तुझे वडील सिरीयस झालेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. असे सांगून साईला दुचाकीवर घेऊन ते भरवेगात निपाणीच्या दिशेने निघाले. साईला संशय आल्याने त्यांनी दुचाकी रोखण्यासाठी आरडाओरडा सुरु करताच अपहरणकर्त्यांनी दुचाकीचा वेग आणखी वाढविला. कांही वेळात अपहरणकर्ते निपाणीजवळ पोहचले. त्यांनी साई यांच्याकडून भास्कर काकडे यांच्या मोबाईलवर काॅल करुन तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. जादा शानपट्टी करुन पोलिसांना कळविला तर याद राखा. तुमच्या मुलग्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी मोबाईल बंद केला. अपहरणकर्त्याच्या धमकीने घाबरलेल्या भास्कर काकडे यांनी लागलीच संकेश्वर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांसमोर साईचं अपहरण प्रकरण कथन करुन अपहरणकर्त्यांनी मोबाईलवरुन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, हवालदार बी. के. नांगनुरी, पोलिस कर्मचारी एम. एम. जंबगी यांनी लागलीच अपहरणकर्त्यांचा तपास हाती घेतला. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा मोबाईल ट्रॅक केला. त्यावरुन अपहरणकर्ते निपाणीच्या जवळपास असल्याचे स्पष्ट झाले. पी.एस.आय गणपती कोगनोळी यांनी निपाणी पोलिसांची मदत घेऊन नाकाबंदी केली. अपहरणकर्त्यांनी सावध भूमिका घेत मोबाईल स्विच ऑफ केला. त्यामुळे पोलिसांच्या शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला. अखेर पोलिसांनी साई यांच्याकडे असलेला मोबाईल ट्रॅक करुन तपास यंत्रणा चालू ठेवली. निपाणी परिसरात ठिकठिकाणी पोलिस तैनात असल्याचे पाहून अपहरणकर्ते भांबावलेले. पोलिस अपहरण प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे अपहरणकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपला प्लॅन बदलला त्यांनी साईला संकेश्वरात पोचविण्यासाठी आपल्या बाईक संकेश्वरमध्ये वळविल्या. होनेहोळ्ळी फाट्यावर साईला सोडून त्यांनी तेथून पळ काढला. होनेहोळी हाॅटेलमध्ये भांबावलेला मुलगा पाहून वाॅचमनने त्याची चौकशी केली. त्याने भास्कर काकडे यांना साई होनेहोळी हाॅटेलमध्ये सुखरुप असल्याचे सांगितले. लागलीच भास्कर काकडे यांनी पोलीस आणि आपल्या मित्रमंडळींना घेऊन होनेहोळी हाॅटेलात पोचून साईला मिठीत घेऊन सुटकेचा निःश्वास सोडला.
अपहरणकर्ते दोनाचे चार झाले…
अपहरण प्रकरणाविषयी सांगतांना साई म्हणाला, मी ट्यूशन संपवून घराकडे परतताना संकेश्वर बसस्टँड जवळ बाईकवरुन दोघे अपरिचित लोक आले. त्यांनी मला पप्पा सिरीयस असल्याचे सांगून बाईकवर बसवून घेतले. दुचाकी निपाणीच्या दिशेने निघाल्यामुळे मी आरडाओरडा करुन बाईक रोखण्याचा प्रयत्न केला पण बाईक भरवेगात असल्यामुळे माझा आवाज लोकांपर्यंत पोचला नाही. निपाणीत अपहरणकर्ते दोनाचे चार झाले. त्यांच्याकडे दोन बाईक होत्या. एकटा उर्दू भाषेतून तर दोघे कन्नड भाषेतून बोलत होते. त्यांनी मला बाईकवर घेऊन निपाणी घ्या चकरा मारल्या. ठिकठिकाणी पोलीस पाहून त्यांनी मला होनेहोळी फाट्यावर सोडून निघून गेले.
संकेश्वर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन..
अपहरणकर्त्यांचा केवळ तीन तासांत छडा लावून कुमार साई याचा शोध लावण्याचे कार्य करणारे संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, हवालदार बी. के. नांगनुरी, पोलिस कर्मचारी एम. एम. जंबगी यांचे सर्वत्र अभिनंदन होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *