
शेवंता कब्बूरींचा सवाल
संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील कारेकाजी पेट्रोल पंप जवळील संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावर गटारीचे सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत असल्याची तक्रार नगरसेविका शेवंता कब्बूरी यांनी केली आहे.आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेवंता कब्बूरी म्हणाल्या संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याला कोणीच वाली दिसेनासा झाला आहे. सदर रस्त्याला जबाबदार कोण? संकेश्वर पालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्पष्टीकरण संबंधित अधिकारऱ्यांनी द्यावे. कारेकाजी पेट्रोल पंप शेजारी असणाऱ्या वसाहतीला जाण्यास रस्ता नाही आणि गटार देखील नाही. त्यामुळे तेथील सांडपाणी संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरुन वाहताना दिसत आहे. पालिका येथे गटार निर्माणचे काम करायला तयार नाही. विचारणा केली असता संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इकडे फिरकेनासे झाले आहेत. सदर रस्ता महाराष्ट्र राज्यातील गडहिंग्लज आजारा चंदगड गावाला तसेच बायपास रोडला जोडणारा असल्यामुळे यामार्गे बस आणि अन्य वाहनधारकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. सदर रस्त्यावर सांडपाणी साचून राहिल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. सदर रस्त्याचा विषय संबंधित अधिकारी गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आता इकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मंत्रीमहोदयांनी संबंधित अधिकारींना संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याची समस्या सोडविणेचा आदेश देण्याची मागणी नगरसेविका शेवंता कब्बूरी यांनी केली आहे.
रास्ता रोको झाले …
संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरुन सांडपाणी वाहत असल्याची तक्रार संबंधित अधिकारींपर्यंत पोहचविणेसाठी दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांनी रास्ता रोको केले होते. त्याची दखल घेत संकेश्वर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी रस्ता पहाणीचे नाटक करुन वेळ मारुन नेण्याचे काम केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याचा प्रश्न कांही सुटेनासा झाला आहे. नगरसेविका शेवंता कब्बूरी आणि येथील नागरिक सदर रस्त्याकरिता आता रस्त्यावर उतरणेचा विचार चालविला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta