संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर- अंकले रस्ता येथे ३० मे २०२२ रोजी भरदुपारी २.३० वाजता पोलीस असल्याचे भासवून श्रीमती जयलक्ष्मी राजू चौगले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबार केलेल्या चोरांना गजाआड करण्यात संकेश्वर पोलिसांना यश मिळाले आहे. याविषयाची पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलेली माहिती अशी की, संकेश्वर-अंकले रस्ता येथील सावेकर ऑईल मिलजवळ अंगणवाडीसेविका श्रीमती जयलक्ष्मी राजू चौगले जात असताना त्यांना मोटारसायकलवरुन चौघांनी गाठले. गावात चोर आलेत तुम्ही असे अंगावर दागिने घालून कोठे निघालात. आपण पोलिस असल्याचे भासवून श्रीमती जयलक्ष्मी चौगले यांना ५० ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याची चेन हातातील सोन्याच्या बांगड्या उतरविणेस सांगितले. सोन्याचे अलंकार कागदात सुरक्षित बांधून देत असल्याचे नाटक करुन जयलक्ष्मी यांचे लक्ष दुसरीकडे विचलित केले. जयलक्ष्मी यांच्या हातात नकली सोन्याचे अलंकार सोपवून असली सोन्याचे अलंकार घेऊन चोर सुसाट वेगाने निघून गेले होते. घटनेची नोंद जयलक्ष्मी यांनी संकेश्वर पोलिसांत नोंदविली होती. त्याची दखल घेत बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक, यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश छायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलिस कर्मचारी बी. के. नांगनुरी, एम. एम. जंबगी, एम. एम. करगुप्पी, बी. व्ही. हुलकुंद, वाय. एच. नदाफ, बी. टी. पाटील, एम. आय. चिपलकट्टी यांनी सापळा रचून नकली पोलीस महंमद युसूफ इराणी (राहणार सांगली) या चोरट्याला गजाआड केले आहे. त्यांनी आपण तीन साथीदारांबरोबर निपाणी, गोकाक, संकेश्वर आणि महाराष्ट्र राज्यातील गडहिंग्लज येथे वाटमारी केल्याचे कबूल केले आहे. चोरट्याकडून संकेश्वर पोलिसांनी १० ग्रॅम वजनाची चेन, चोरीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी, एक मोबाईल हॅ़डसेट जप्त केले आहे. केवळ तीन महिन्यांत अंकले-संकेश्वर रस्ता येथील चोरीचा तपास लावण्याचे कार्य केल्याबद्दल संकेश्वर पोलिसांचे नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta