संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात जाताजाता कोसळणाऱ्या पूर्वा फाल्गुनी पावसाने हिरण्यकेशी नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आलेले दिसत आहेत. दमदार पावसाने गोकाक येथील लोळसूर ब्रिज पाण्याखाली आले असून ब्रिजवरील पाण्यातून दुचाकी चारचाकी वाहने भरवेगात ये-जा करतांना दिसत आहेत. संकेश्वर परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज दिड-दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पाण्याखाली आलेला दिसत आहे. सदर ब्रिज पाण्याखाली आल्याने लगतच्या महाराष्ट्र राज्यातील नांगनूर, खनदाळ येथील लोकांना आता संकेश्वरला वळसा घालून गोटूर बंधारावरुन ये-जा करावे लागत आहे. हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी महापूराचा धोका नसल्याचे सांगितले जात आहे. कारण हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधारा हटविणेत आल्यामुळे नदीतील महत्वाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह दुप्पटीने वाढून पाणी जोरदारपणे वाहताना दिसत आहे.

जनजीवन विस्कळित, पिकांचे नुकसान…
संकेश्वर भागात संततधार बरसणाऱ्या पावसाने लोकांचे जनजीवन विस्कळित झालेले दिसत आहे. पावसाने किरकोळ व्यापारी वर्गाला मोठा फटका बसलेला दिसत आहे. रोजंदारी कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे. पूर्वा फाल्गुनी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. मोठ्या कष्टातून हाती आलेल्या सोयाबीन पीकाचे मोठें नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तवली जात आहे. पावसामुळे सोयाबीन काढणी मळणीचे काम लांबणीवर पडलेले दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta