
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला आज अंगारक संकष्ट चतुर्थी दिनी भक्तांची गर्दी ओसरलेली दिसली. दुपारी निलगार गणपती दर्शनासाठी भक्तांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी गर्दी ओसरलेली दिसली. त्यामुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे आरामात दर्शन घेता आले.
आर्थिक स्थितीचा परिणाम..
सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना तसेच शेतकरी आणि कष्टकरी लोकांची आर्थिक स्थिती कोरोना महामारीमुळे चांगलीच खालावलेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षानंतर आता कोठे सामान्य माणूस सावरतांना दिसतं आहे. आर्थिक स्थिती जेमतेम असल्यामुळे लोकांत फारसा उत्साह दिसेनासा झाला आहे. निलगार गणपतीला यंदा भक्तांची संख्या घटनेस हे देखील कारण सांगितले जात आहे. त्याचबरोबर रविवार सुट्टीच्या दिवशी आणि अंगारक संकष्ट चतुर्थीला निलगार गणपती दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेता बाहेर गावाहून येणारे भक्तगण अधेमधेच येऊन दर्शन घेवून जात असल्याचे देखील सांगितले जात आहे.
दोनाचे तीन गणपती…
संकेश्वरातील हेद्दुरशेट्टी परिवारात पूर्वी एकच नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीची प्रतिष्ठापना करुन उत्सव साजरा केला जात असे. कालांतराने हेद्दुरशेट्टी परिवारात एकाच दोन गणपती प्रतिष्ठापना करुन उत्सव साजरा होऊ लागला. यंदा मिर्जे यांच्या विघ्न गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली दिसत आहे. त्यामुळे भक्तगणांना तीन ठिकाणी गणपती दर्शनाचा लाभ होतांना दिसत आहे.
उलाढाल घटली…
निलगार उत्सवानिमित्त आझाद रस्ता ते हेद्दुरशेट्टी यांच्या निवासस्थानापर्यंत दोहो बाजुला पेढे स्टाॅल, नैवेद्य साहित्याची दुकाने, खेळणीची दुकाने, महिला प्रसाधनाची दुकाने आकर्षकरित्या थाटण्यात आली आहेत. त्याचबरोबर पाणीपुरी भेळ गाडे, टी-स्टाॅल देखील थाटणेत आले आहेत. यंदा व्यापार जेमतेम असल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे. ॲटोरिक्षा व्यवसाय देखील जेमतेम असल्याचे ॲटोरिक्षा चालकांतून सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta