Tuesday , March 3 2026
Breaking News

निलगार दर्शनाला भक्तसागर लोटला…

Spread the love

 


दर्शनाला लांबचलांब एक कि.मी रांगा..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. अदमासे एक लाख भाविकांनी निलगार गणपतीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. उद्या सोमवार दि. १९ रोजी निलगार गणपतीचे विसर्जन होणार असल्याने शनिवार आणि रविवारी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले दिसले. निलगार गणपती दर्शनासाठी आज सकाळी ५ वाजताच भक्तगण संकैश्वरात दाखल झालेले दिसले. निलगार दर्शनासाठी हेद्दुरशेट्टी निवासस्थानापासून नदी गल्लीतील तालीम गल्ली पर्यत लांबचलांब रांगा लागलेल्या दिसल्या. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्रप्रदेश राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेले दिसले.

महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला…
हेद्दुरशेट्टी परिवारात परंपरागत चालत आलेल्या पध्दतीनुसार आज महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. एकीकडे निलगार गणपती दर्शनाला भक्तांच्या लांबचलांब रांगा आणि दुसरीकडे महाप्रसादासाठी भक्तांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. बाप्पांचे दर्शन आणि महाप्रसाद एकाच ठिकाणी असल्यामुळे संकेश्वर पोलिसांंची चांगलीच दमछाक झालेली दिसली. निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी आणि हेद्दुरशेट्टी परिवारातील लोकांंनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

भक्तगणांना एक नव्हे तीन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ…
हेद्दुरशेट्टी परिवारात पूर्वापार एकाच निलगार गणपतीची प्रतिष्ठापना करुन निलगार उत्सव साजरा केला जात असे. कालांतरांने हेद्दुरशेट्टी परिवारात एकाचे दोन गणपती झाले. यावर्षी दोनाचे तीन गणपती प्रतिष्ठापना झाले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना तीन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेता येऊ लागलेला दिसत आहे. संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीची प्रतिष्ठापना शिवपूत्र हेद्दुरशेट्टी, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी हे भावंडे करतात. दुसऱ्या निलगार गणपतीचे प्रमुख अप्पासाहेब हेद्दुरशेट्टी असून यावर्षी कुमार बंगारी (मिर्जी) यांनी आपल्या निवासस्थानी तिसऱ्या विघ्न गणेशाची प्रतिष्ठापना करुन उत्सव साजरा करतांना दिसताहेत.

लाखोंची उलाढाल…
यंदा निलगार गणपती उत्सवात अंगारक संकष्ट चतुर्थी पर्यंत भक्तांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे व्यापारी वर्ग काळजीत दिसत होता. गेल्या दोन दिवसांत व्यापारी वर्गाला निलगार गणपती पावलेला दिसत आहे. संकेश्वर आझाद रस्ता ते हेद्दुरशेट्टी निवासस्थानापर्यंत दोहो बाजुला पेढे स्टाॅल नैवेद्य साहित्याची दुकाने खेळणीची दुकाने महिला प्रसाधनाची दुकाने पाणीपुरी भेळ आणि आईस्क्रीम गाडे टी-स्टाॅल आकर्षकरित्या थाटण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या व्यापारात बरकत झालेली दिसत आहे. ॲटोरिक्षा चालक-मालकांना देखील गेले दोन दिवस लाभदायक ठरलेले दिसत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *