
उत्पादन घटले, दरातही घसरण..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन चांगलेच घटलेले दिसत आहे. दरात देखील मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४८०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचे बंपर पीक हाती येणार अशी आशा बाळगली होती. पण निसर्गाने साथ कांही दिली नाही. ऐन बियाने भरणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेल्याचे सांगितले जात आहे.
काळे (डागी) सोयाबीन…
संकेश्वर भागात सोयाबीन काढणी मळणीचे काम केले जात आहे.तांबेरा रोगांने आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन काळे (डागी) झाल्याने दरात मोठी घसरण झाल्याचे सोयाबीन व्यापारी दिपक भिसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले यंदा सोयाबीनचे पीक बंपर येणार असा अंदाज होता. पण तो फोल ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या सोयाबीन आवकमध्ये डागी सोयाबीन दिसत आहे. त्यामुळे सध्याचा सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४८०० ते ४९०० रुपये आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दर ५८०० ते ६००० रुटये होता. आता दरात घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली दिसत आहे. तांबेरा रोगामुळे उत्पादन देखील जेमतेम असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta