
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवशक्ती जनरल स्टोअर्सने घनकचरा रस्त्यावर फेकून दिल्याने आज पालिकेने दंडात्मक कारवाई केलेली दिसत आहे. शिवशक्ती दुकान मालकाने कचरा रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून येताच आज पालिका सॅनेटरी सुपरवायझर श्रीधर बेळवी, मुकादम सुनिल पाटील, परशराम सत्यनाईक, कृष्णा खातेदार यांनी दुकान मालक वागाराम माळी याला चांगलेच खडसावले. गावात कचरा गोळा करण्यासाठी पालिकेची घंटा गाडी दुकानाच्या दारापर्यंत येत असताना कचरा रस्त्यावर का फेकून दिलात? असा जाब विचारला असता दुकान मालक वागाराम निरुत्तर झाले. त्यांनी पालिकेची माफी मागितली. येथून पुढे कधीच कचरा रस्त्यावर फेकून देणार नसल्याचे सांगून कचरा घंटा गाडीला देण्याची प्रतिज्ञा केली. पालिकेच्या स्वच्छता विभागाने शिवशक्ती दुकान मालकांकडून एक हजार रुपये दंड आकारले आहे.
पालिकेचे सॅनिटरी सुपरवायझर श्रीधर बेळवी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, संकेश्वर पालिकेने स्वच्छ संकेश्वर, सुंदर संकेश्वर बनविण्यासाठी कचरा निर्मूलनावर जादा लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेने गावात घनकचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी, ट्रॅक्टर आणि कांही वाहने देखील कार्यरत ठेवली आहेत. गावातील सर्व २३ प्रभागातील नागरिकांना प्रत्येक घराला ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी प्लास्टिक बकेट वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सफाई कामगार गावात स्वच्छतेचं काम जोमाने करताहेत. संकेश्वर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी लोकांचे सहकार्य हवे असल्याचे त्यांनी सांगितले. गावात कोणीही घनकचरा रस्त्यावर फेकून देण्याचे करु नये. कोणी केल्यास पालिका दंडात्मक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta