सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक सोलापूर गेटजवळ आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये किंमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने चालक, क्लीनरसह 40 प्रवाशांचे प्राण वाचले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मुंबई येथून शर्मा ट्रॅव्हल्सची खासगी बस बंगळूर येथे जात होती. या बसमधून 38 प्रवासी प्रवास करीत होते. ही बस पहाटेच्या सुमारास संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेटजवळ आली असता मागील दोन्ही चाके एकमेकांना घर्षण (लायनिंग जाम झाल्याने) शॉर्टकट होऊन बसला मागील बाजूने आग लागली. ही आग इतकी भीषण होती की केवळ पंधरा मिनिटात सदर बसला आगीने वेढले. दरम्यान यावेळी चालक सिद्धाप्पा (वय 38) रा. बेळगाव यांनी प्रसंगावधान राखुन क्लीनरच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले.
घटनेची माहिती मिळतात रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संकेश्वर पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानुसार संकेश्वर अग्निशमन दलाचे निरीक्षक ए. आय. रुद्रगौडर यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच सदर बस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जळून खाक झाली. घटनास्थळी संकेश्वर पोलीस ठाण्याचे सीपीआय एस.एम. औजी यांच्यासह हवालदार राजू कडलस्कर यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा निरीक्षक शशिधर निलगार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.