संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हरगापुर गावाजवळ दरोडेखोरांनी कार आडविली व व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून कारमधील 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास करून पलायन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूरहून केरळकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा दरोडेखोरांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग केला व हरगापुर गावाजवळ कार थांबवली व त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून कारमधील प्रवाशांना खाली उतरवले आणि कारमधील 75 लाख रुपयांचा ऐवज घेऊन कारसह फरार झाले.
कारमधून प्रवास करणारे सोन्याचे व्यापारी सूरज वनमाने हे कोल्हापूरला आपला सोन्याचा व्यापार उरकून पैसे घेऊन केरळकडे आपल्या गावी जात होते. मात्र वाटेतच दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा घातला.
घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.