नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संयुक्त सचिव पदांसाठी आजपासून ( दि. ११) निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर असून, सचिवपदासाठी पुन्हा एकदा जय शाह हे आपला अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बीसीसीआय निवडणुकीसाठी दि. ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल होणार आहेत. १३ ऑक्टोबर अर्जांची छाननी होईल. तर १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. राजीव शुक्ला हे उपाध्यक्षपदासाठी दावेदार असू शकतात, असे मानले जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार आशिष शेलार हे खजिनदार पदासाठी अर्ज करु शकतात. सध्या अरुण धूमल यांच्याकडे हे पद आहे. धूमल यांच्याकडे आयपीएलचे चेअरमनपद सोपविण्यात येणार आहे. तर संयुक्त सचिव पदासाठी देबोजित शौकिया अर्ज करणार आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली होती. या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिनी यांचादेखील समावेश होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले होते. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta