कराची : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या क्रिकेटचे सामने होत नाहीत. आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत पहायला मिळते. दरम्यान, अगामी आशिया चषकाचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधले क्रिकेट सामने खेळवले जावेत अशी विनंती केली आहे.
दोहा येथील लिजंड क्रिकेट लिग स्पर्धेदरम्यान आफ्रिदी म्हणाला, ‘मी मोदी साहेबांना विनंती करेन की त्यांनी दोन्ही भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने होऊ द्यावेत. जर आपण समोरच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहोत पण समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलतही नसेल तर आपण काय करणार? बीसीसीआय हे एक सक्षम क्रिकेट बोर्ड आहे यात काही शंका नाही. परंतु जेव्हा तुम्ही सक्षम असता तेव्हा तुम्हाला जबाबदारीने वागावे लागते. तुम्ही तुमच्यासाठी शत्रू तयार करू शकत नाही, तुम्हाला मित्र बनवावे लागतात. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त मित्र बनवता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होता, अशी भावना त्याने व्यक्त केली.
यादरम्यान आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कमकुवत आहे का असा प्रश्न विचारला असता आफ्रिदीने, पीसीबी कमकुवत नाही परंतु काही प्रश्नांची उत्तरे ही बीसीसीआयकडून येणेही गरजेचे आहे. आजही भारतीय संघातील खेळाडूंसोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही जेव्हा कधीही भेटतो तेव्हा आम्ही गप्पा मारतो. परवाच मला सुरेश रैना भेटला, मी त्याला त्याची बॅट मागितली त्याने मला लगेच बॅट दिली, असेही अफ्रिदीने स्पष्ट केले.