भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सुरू होणार आहे. दरम्यान, आयसीसीने या सामन्यापूर्वी विजेत्या संघावर किती पैशांचा वर्षाव केला जाईल आणि उपविजेत्या संघाला किती पैसे दिले जातील याची घोषणा केली.
बक्षिसाच्या रकमेत कोणताही बदल नाही
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूटीसी फायनल जिंकणाऱ्या संघाला जवळपास 13.23 कोटी तर पराभूत संघाला 6.61 कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. मागील पर्वाच्या तुलनेत यावेळी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डब्ल्यूटीएसी 2019-21 च्या अंतिम फेरीपूर्वी विजेत्या संघांसाठी बक्षीसाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. डब्ल्यूटीसीचे पहिले पर्व न्यूझीलंडने जिंकून इतिहास रचला होता. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने विजेतेपदाच्या लढतीत भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता.
द. आफ्रिका, इंग्लंड आणि श्रीलंकेला किती रक्कम मिळणार?
यंदाच्या पर्वात द. आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. या संघाला सुमारे साडेतीन कोटी रुपये मिळणार आहेत. इंग्लंडचा संघाला यावेळी 46.96 गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी इंग्लिश संघाच्या खात्यात सुमारे 2.8 कोटी रुपये जमा होणार आहेत. तर पाचव्या स्थानावर स्पर्धेचा प्रवास संपवणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला जवळपास 1.6 कोटी रुपये मिळणार असल्याचे, आयसीसीने जाहीर केले आहे.
इतर संघांना सुमारे 82-82 लाख रुपये मिळणार
डब्ल्यूटीसी 2021-23 मध्ये एकूण 9 संघांनी भाग घेतला. गतविजेत्या न्यूझीलंडने यावेळी निराशा केली आणि त्यांना 13 पैकी केवळ 4 कसोटी सामने जिंकता आले. किवीजची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली. त्यापाठोपाठ पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ अनुक्रमे 7व्या, 8व्या आणि 9व्या स्थानावर राहिले. गुणतालिकेतील या तळातील संघांना यावेळी सुमारे 82-82 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल असेही आयसीसीने म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta