मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे सातत्यपूर्ण कामगिरीचे लक्ष्य असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी त्यांच्यापुढे पंजाब किंग्जचे आव्हान आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळूरुचा फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.
ड्युप्लेसिस, हेझलवूडवर भिस्त
बंगळूरुचा माजी कर्णधार कोहलीला यंदाच्या हंगामात धावांसाठी झगडावे लागले आहे. त्याला १२ सामन्यांत फक्त एका अर्धशतकासह २१६ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे कोहली या सामन्यात कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल. बंगळूरुच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार ड्युप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक या अनुभवी त्रिकुटावर आहे. त्यांना रजत पटिदार आणि महिपाल लोमरोर यांनी चांगली साथ दिली आहे. गोलंदाजीत लेग-स्पिनर वािनदू हसरंगा (१२ सामन्यांत २१ बळी), जोश हेझलवूड (आठ सामन्यांत १३ बळी) चमकदार कामगिरी करत आहेत.
धवनकडून अपेक्षा
सलामीवीर शिखर धवनने (११ सामन्यांत ३८१ धावा) यंदा पंजाबकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे बंगळूरुविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत भानुका राजपक्षा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना फटकेबाजी करण्यात यश आले आहे. गेल्या सामन्यात जॉनी बेअरस्टोने हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला सलामीला खेळता यावे यासाठी कर्णधार मयांक अगरवालने चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला. तो केवळ १५ धावाच करू शकला. त्याच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. पंजाबच्या गोलंदाजीची भिस्त कॅगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग यांच्यावर आहे.
Belgaum Varta Belgaum Varta