मुंबई : आयपीएल 2024 मधील पहिला सामना जिंकत राजस्थान रॉयल्स संघाने विजयी सुरूवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघावर 20 धावांनी विजय मिळवलाय. राजस्थान संघाने 20 ओव्हर 193-4 धावा केल्या होत्या. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करण्यात लखनऊ संघ अपयशी ठरला, 20 ओव्हरमध्ये 173-6 धावा करू शकला. सामन्यातील शेवटच्या ओव्हरपर्यंत लखनऊ संघाकडून निकोलस पूरन याने एकाकी झुंज देत होता. 41 बॉलमध्ये 64 धावांची नाबाद खेळी पूरनने केली मात्र त्याला समोरून साथ न मिळाल्याने सामना शेवटच्या पाच ओव्हरमध्ये निसटला.
राजस्थान संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. ओपन क्विंटन डिकॉक पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात 4 धावांवर आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये देवदत्त पड्डीकल याला शून्यावरच बोल्टने बोल्ड केलं. दोन विकेट गेलेल्या असताना आयुश बदोनी मैदानात आला त्याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या मात्र नांद्रे बर्गरने त्याला 1 वर माघारी धाडलं.
चार ओव्हरच्या आतमध्ये तीन विकेट गेलेल्या असताना दीपक हुड्डाने मोठे फटके खेळत धावसंख्येला गती देण्याचं काम केलं पण त्याला चतुर चहलने आपलं शिकार केलं. निकोलस पूरन याने कॅप्टन के.एल. राहुलसोबत भागीदारी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्यानंतर निकोलस पूरने आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली.
सामना शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत नेला होता. राहुल याला 17 व्या ओव्हरमध्ये संदीप शर्मा याने राहुलला 58 धावांवर माघारी पाठवत सामना राजस्थानच्या बाजुने झुकवला होता. त्यानंतर निकोलस पूरन याने आपली ताकद दाखवली. गड्याने सामना शेवटपर्यंत ताणला पण संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही.