कोणाचे आव्हान संपुष्टात येणार?
मुंबई : काल झालेल्या राजस्थान आणि गुजरात टायटन्स यांच्या लढतीत गुजरातने विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आजच्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यामधील विजयी संघाला क्वॉलिफायर-2 सामन्यात राजस्थानशी दोन हात करावे लागतील. तर पराभूत संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे बंगळुरु आणि लखनऊ यांच्यात आजचा सामना म्हणजे करो या मरोची लढाई आहे.
आजच्या सामन्यातील दोन्ही संघ तूल्यबळ आहेत. त्यामुळे आजची लढत चांगलीच संघर्षपूर्ण होणार आहे. लखनऊ संघाकडे केएल राहुल हा दिग्गज फलंदाज आहे. त्याने या हंगामात शतकी खेळी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तो तळपेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे एव्हिन लुईस, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस यांच्यासारखे दिग्गज फलंदाज लखनऊकडे आहेत. तसेच या हंगामात मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे बंगळुरुला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.
तर दुसरीकडे बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसला आहे. त्याने गुजरात टायटन्सविरोधात खेळताना 73 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही तो चांगली कामगिरी करेल अशी संघाला अपेक्षा आहे. तसचे कोहलीसोबतच फॅफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे दिग्गज फलंदाज बंगळुरुकडे आहेत. दिनेश कार्तिकसारखा फिनिशरदेखील बंगळुरुच्या ताफ्यात आहे. तसेच गोलंदाजी विभागात जोस हेझलवूड, वानिंदू हसरंगा या गोलंदाजांची फळी बंगळुरु संघाकडे आहे. त्यामुळे लखनऊच्या खेळाडूंना बंगळुरुला नमवण्यास चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॉमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड
Belgaum Varta Belgaum Varta