Thursday , September 19 2024
Breaking News

पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय

Spread the love

नवी दिल्ली : डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

भारताने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा अवघ्या 10 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर डिकॉक आणि प्रिटोरिअस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण प्रिटोरिअस 29 आणि डिकॉक 22 धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळला असे वाटत असतानाच डुसेन आणि डेविड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. दोघांनी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची भागिदारी केली.
डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांनी वादळी अर्धशतकी खेळी करत 212 धावांचं आव्हान सहज पार केले. डेविड मिलरने नाबाद 64 तर डुसेन याने नाबाद 75 धावांची खेळी केली. दोघांनी तब्बल 10 षटकार लगावले. मिलर आणि डुसेनच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. भारताकडून एकाही गोलंदाजाने अचूक टप्प्यावर मारा केला नाही. प्रत्येक गोलंदाजाला 9 पेक्षा जास्त सरासरीने चोप बसला. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईशान किशन (76) याची वादळी खेळी, त्यानंतर हार्दिक-पंतचा फिनिशिंग टचच्या जोरावर भारतीय संघाना निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या.
ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला दमदार सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड 23 धावांवर बाद झाला. गायकवाड बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी 40 चेंडूत 80 धावांची भागिदारी केली. यामध्ये अय्यरने 15 चेंडूत 28 तर ईशान किशनने 25 चेंडूत 50 धावा चोपल्या. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर लागोपाठ बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव कोलमडतोय असं वाटले. पण हार्दिक पांड्या आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी हाणामारीच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. ईशान किशन 76 तर श्रेयस अय्यर 36 धावांवर बाद झाले. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षठकात धावांचा पाऊस पाडला. पंत 16 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान पंतने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच देत संघाची धावसंख्या 200 पार पोहचवली. हार्दिक पांड्याने 31 धावांची नाबाद खेळी केली.

ईशानचं वादळी

सलामी फलंदाज ईशान किशन याने पहिल्या टी 20 सामन्यात वादळी खेळी केली. ईशान किशन याने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. ईशान किशन याने आधी ऋतुराजसोबत संघाला दमदार सलामी दिली. त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. ईशान किशनने 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ईशान किशन याने 11 चौकार तीन षटकारांचा पाऊस पाडला. ईशान किशनच्या वादळी खेळीच्या बळावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली.

हार्दिक-पंतचा फिनिशिंग टच

हाणामारीच्या षटकात हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी चौकार आणि षटकार लगावत अखेरच्या षटकात भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. पंत 16 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. पंत आणि हार्दिक पांड्याने 18 चेंडूत 46 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच दिला. हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली.

एडन मार्करमला कोरोनाची बाधा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेकीवेळी सांगितले की, एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला पहिल्या टी 20 सामन्यातून वगळण्यात आलेय. मालिकेतील पहिल्या सामन्यातच खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. तसेच या मालिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. दोन्ही संघ तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारत या मालिकेसाठी बीसीसीआयने बायो बबल हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पहिल्याच सामन्याआधी खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे. याबाबत चर्चा सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Spread the love  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *