Thursday , November 21 2024
Breaking News

रीस टॉपलीची भेदक गोलंदाजी; भारतीय फलंदाजांची शरणागती

Spread the love

भारताचा 100 धावांनी पराभव

लंडन : भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती पार पडला. या सामन्यात यजमान इंग्लंडने रीस टॉपलीच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे भारताचा १०० धावांनी पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आली आहे. १२ जुलै रोजी केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला होता.

यजमान इंग्लंडने विजयासाठी दिलेले २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय डावाची सुरुवात निराशादायक झाली. कर्णधार रोहित शर्मा १० चेंडू खेळून एकही धाव न मिळवता बाद झाला. त्यापाठोपाठ शिखर धवन, ऋषभ पंत झटपट बाद झाले. चांगली सुरुवात केल्यानंतर विराट कोहली मोठी खेळी करील अशी अपेक्षा होती. मात्र, तोदेखील १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव २७ धावा करून त्रिफळाचित झाला. त्यापाठोपाठ लगेच हार्दिक पंड्याही पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजा (२९) आणि मोहम्मद शमीने (२३) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भारताला विजयापर्यंत नेणे शक्य झाले नाही.

इंग्लंडच्या रीस टॉपलीने भारतीय फलंदाजांना अजिबात माना वरती काढू दिल्या नाहीत. त्याने ९.५ षटकांत २४ धावा देऊन सहा बळी घेतले. त्याशिवाय, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

त्यापूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ४९ षटकांत सर्वबाद २४६ धावा केल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे याही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. इंग्लंडचे सलामीचे पाच फलंदाज अगदी स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर मोईन अलीने आणि डेव्हिड विलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५०पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. मोईन अलीने सर्वाधिक ४७ धावा केल्या तर डेव्हिड विलीने ४१ धावांचे योगदान दिले.

भारताकडून युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात ४७ धावा देऊन चार बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाची लॉर्ड्सवरील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांच्याशिवाय हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन तर मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक बळी घेतला.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *