Monday , December 8 2025
Breaking News

चहावाल्याच्या लेकीला रौप्य; कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने देशाला पदक जिंकून दिले

Spread the love

 

मुंबई : अपंग चहा विक्रेत्याची मुलगी असलेल्या निकिता कमलाकरने आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. पुण्याच्या हर्षदा गरुडने सोमवारी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या निकिताने मंगळवारी रुपेरी यश मिळवले.
निकिता ताश्कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ५५ किलो गटात स्नॅचमध्ये ६८ किलो वजनच पेलू शकली. त्यामुळे तिला या प्रकारात सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते; पण तिने क्लीन अँड जर्कमध्ये सर्वाधिक ९५ किलो वजन उचलून गटातील सुवर्णपदक जिंकले. तिने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या मुलीपेक्षा चार किलो वजन जास्त उचलले होते. निकिताने एकूण १६३ किलो वजन पेलून दुसरा क्रमांक मिळवला.

तीन वर्षांपू्र्वी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून प्रकाशात आलेल्या निकिताने गत वर्षीच्या पतियाळा येथील राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

वेटलिफ्टिंगमधील तिचे कौशल्य चंदू माळी यांनी हेरले. तिला सुरुवातीस आई-वडिलांनी कर्ज काढून खुराक उपलब्ध करून दिला होता. सातत्यपूर्ण यशामुळे तिची राष्ट्रीय शिबिरात निवड झाली आहे. ही निवड योग्य असल्याचे तिने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकून दाखवून दिले.

जागतिक स्पर्धेत पदक दूरावल्यामुळे निकिता निराश झाली होती. त्या वेळी तिने आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारच याची ग्वाही दिली होती. तिने आपला शब्द खरा केला, असे तिचे प्रशिक्षक चंदू माळी यांनी सांगितले. आपल्या मुलीने आशियाई पदक जिंकल्यामुळे निकिताचे वडिल पांडुरंग खूश होते. दोन्ही पायांनी अपंग असलेले पांडुरंग सायकलवरून चहा विकतात, तर निकिताची आई अनिता नर्स आहे. आमच्या कोल्हापूरचे नाव तिने उंचावले, अशी भावना पांडुरंग यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *