बेंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळातील मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून ते आज सायंकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारने वाल्मिकी महामंडळात 87 कोटी रुपयांची लूट केली. या घोटाळ्यात मंत्री बी. नागेंद्र यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वीच केला होता आणि नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज नागेंद्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सादर करतील.
वाल्मिकी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर पैशांच्या हस्तांतरणासाठी दबाव आणल्याचा आरोप करत सुसाईड नोट लिहून शिमोगा येथे अधिकारी राजशेखर यांनी आत्महत्या केली. महामंडळात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पुष्टी केली की, नागेंद्र सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये म्हणून स्वेच्छेने राजीनामा देणार आहेत. बी. नागेंद्र थोड्या वेळाने पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर संध्याकाळी राजीनामा सादर करतील.