Thursday , September 19 2024
Breaking News

नंदिनी दूधाच्या दरात दोन रुपयाने वाढ

Spread the love

 

प्रति लिटर ५० मिली अतिरिक्त दूध मिळणार

बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महामंडळाने दुध दरात बदल केला असून दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्या (ता. २६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे.
नंदिनी दुधाच्या दरात वाढ झाल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक लिटर दुधाच्या पाकीटात ५० मिली अतिरिक्त दूध देऊन उद्यापासून दुधाचे पाकिट ग्राहकांना वितरित केले जाणार आहे. ५० मि.ली. अतिरिक्त दूधाची किंमत २ रुपये १० पैसे होते. एक लिटर ५० मिलीसाठी १० पैसे सोडून आम्ही पॅकेटमध्ये २ रुपयांची वाढ केली आहे.
अर्धा व एक लिटर नंदिनी दूधाच्या पॅकेटमध्ये अतिरिक्त ५० मिली दुधाची भर पडणार असून ही अतिरिक्त दुधाची किंमत असून दुधाच्या दरात प्रत्यक्ष वाढ झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या नंदिनी ब्लू पॅकेट दुधाची किंमत ४२ रुपये आहे. त्यामुळे उद्यापासून ते ४४ रुपये होईल. अर्धा लिटर दुधाचा भाव २२ रुपयावरून २४ रुपये करण्यात येईल. अर्धा लिटर दुधाच्या पाकीटातही ५० मिली दूध वाढवून वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दही आणि इतर नंदिनी उत्पादनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या सुगीच्या हंगामामुळे सर्व दूध संघांमध्ये दुधाचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे, सध्याचा साठा एक कोटी लिटरच्या जवळपास आहे, आणि या पार्श्वभूमीवर ग्राहकांना एक लिटर व अर्धा लिटर पाकीटात ५० मिली अतिरिक्त दूध देण्याचे ठरले आणि या अतिरिक्त दुधाची किंमत म्हणून दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, एक लिटर ५० मिली दुधाच्या पॅकेटमागे दोन रुपयांची वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे. महामंडळाकडे जुन्या किमतीच्या छापील दुधाच्या पाकिटांचा साठा असून जोपर्यंत हा साठा संपत नाही तोपर्यंत जुन्याच छापील पाकिटांमध्ये दुधाचा पुरवठा केला जाईल, यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकरात नुकतीच वाढ केली होती. त्यामुळे प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली असून, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने जनक्षोभ उसळला होता. पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही संसाधने जमवण्यासाठी करण्यात आल्याचा दावा सरकारने केला होता.
आता दुधाच्या दरात वाढ करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकही हादरले आहेत.
केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक एन. के. जगदीश, पणन संचालक रघुनंदन, मंडळ संचालक वीरभद्रबाबू, भरमण्णवर आदी उपस्थित होते.
राज्यव्यापी संघर्ष
नंदिनी दूध दरवाढीला भाजपने विरोध दर्शवला असून दूध दरवाढ मागे न घेतल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा विरोधी पक्ष भाजपने दिला आहे .
याबाबतचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर ट्विट केले आहे. विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी दरवाढीला विरोध करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
दर वाढीला केएमएफ जबाबदार
दरवाढीनंतर तीव्र टीका होत असून दुधाच्या दरवाढीला सरकार नाही तर केएमएफ जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात दुधाचे दर कमी आहेत. दुधाच्या दरवाढीबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गृह कार्यालय, कृष्णा येथे पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की इतर राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन भाडे वाढवले ​​जाईल. “माझ्या माहितीनुसार, इतर राज्यांच्या तुलनेत येथे दर कमी आहे,” असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *