बंगळूर : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध सीआयडी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या आईने सदाशिवनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी येडियुरप्पा यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर सरकारने हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवले.
विशेष सरकारी वकील अशोक नाईक यांनी सांगितले की, येडियुरप्पा यांच्याविरुद्ध विशेष पॉक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरोपपत्रात काय आहे?
एका जुन्या प्रकरणाची चौकशी करत असताना येडियुरप्पा यांनी तिला एका खोलीत नेले आणि अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले आणि मुलीने विरोध केल्यावर पैसे पाठवले, असे आरोपपत्रात नमूद आहे. त्यानंतर मुलीच्या आईने फेसबुकवर पोस्ट टाकली. नंतर तिघांनी पोस्ट केलेला व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न केला. वाय. एम. अरुण, एम. रुद्रेश आणि जी. मारिस्वामी यांच्यावर महिलेला आणून व्हिडिओ पोस्ट हटवल्याचा आरोप आहे.
१७ वर्षीय मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, येडियुरप्पा यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्या बंगळूर येथील राहत्या घरी तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.