Tuesday , September 17 2024
Breaking News

डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडा

Spread the love

 

चंद्रशेखर स्वामीजींचे सिध्दरामय्या यांना आवाहन

बंगळूर : सर्वजण मुख्यमंत्री झाले, डी. के. शिवकुमार यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले मुख्यमंत्रीपद सोडून डी. के. शिवकुमार यांना संधी द्यावी, असे आवाहन विश्व वक्कलीग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामीजी यांनी केले आहे.
नाडप्रभू केम्पेगौडा हेरिटेज साईट डेव्हलपमेंट अथॉरिटी, बीबीएमपी आणि कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे शहरातील कंठिरवा स्टेडियमवर आयोजित नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मन मोठे केल्यास हे शक्य आहे. मी सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा सलाम करतो. कृपया, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा.
सर्वांनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगली आहे. आमचे डी.के. शिवकुमार झाले नाहीत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून खूप अनुभव आहे. डी. के. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी आता पद सोडावे, पुढील काळात त्यांचे कल्याण होवो. हे केवळ सिद्धरामय्याच करू शकतात. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे यावेळी सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार मंचावर होते. यापूर्वी बंगळुरचे विभाजन करण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु आंदोलनामुळे ते स्थगित करण्यात आले. अशीच चर्चा आता पुन्हा सुरू आहे. हे सोडून दिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन भाग केले आणि उत्तर कर्नाटकचा सर्वांगीण विकास झाला तर त्या भागातून बंगळुरला होणारे स्थलांतर टाळता येईल, असे ते म्हणाले.
पट्टनायकनहळ्ळी श्रीक्षेत्र श्री स्पटिकपूर महासंस्थानचे अध्यक्ष श्री डॉ. नंजावधूत स्वामीजी यांनी, केंपेगौडा जयंती उत्सवासह अनेक मागण्यांना प्रतिसाद दिल्याबद्दल सिद्धरामय्या यांचे कौतुक केले.
जगज्योती बसवेश्वरांच्या फोटोप्रमाणे नाडप्रभू केम्पेगौडा यांचे चित्र किमान बंगळुरच्या हद्दीतील सरकारी कार्यालयांमध्ये लावावे. नाडप्रभूंचा ग्रंथ केजी ते पीजीपर्यंत स्वीकारावा, असा त्यांनी आग्रह व्यक्त केला.
कार्यक्रमाला आदिचुंचनगिरी महासंस्थेचे पीठााध्यक्ष डॉ.श्री निर्मलानंदनाथ महास्वामीजी, श्री क्षेत्र पट्टनायकनहळ्ळी स्फटिकपुरी महासंस्थान मठाचे पीठाध्यक्ष डॉ. श्री नंजवधूत स्वामीजी, विश्व महासंस्थेचे श्री स्वामीजी, मंत्री कृष्णा भैरेगौडा, शिवराज तंगडगी, आमदार रिझवान हर्षद, विश्वनाथ, विधान परिषद सदस्य पुटण्णा, गोविंदराजू, सलीम अहमद, रामोजी गौडा, वक्कलीग संघाचे अध्यक्ष हनुमंतरायप्पा आदी उपस्थित होते.
सत्ता हस्तांतर हायकमांडचा निर्णय
स्वामीजींच्या आवाहनावर कार्यक्रमानंतर पत्रकारांजवळ प्रतिक्रीया देताना मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी, मुख्यमंत्री अधिकार हस्तांतर हा विषय पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही कार्य करतो. लोकशाहीत पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाला महत्व आहे. त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करतो, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *