बंगळूर : चित्रदुर्गा रेणुकास्वामी हत्याकांडातील चालेंजिंग स्टार दर्शन थुगुदीप, त्यांची मैत्रीण पवित्रा गौडा आणि अन्य १५ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
दर्शन आणि पवित्रासह सर्व १७ आरोपींची न्यायालयीन कोठडी आज संपल्याने, त्यांना बंगळुर आणि तुमकूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, की आरोपींची सुटका केल्याने चालू तपासात अडथळा येईल. आरोपींनी कायद्याकडे दुर्लक्ष करून तांत्रिक, भौतिक आणि वैज्ञानिक पुरावे नष्ट करण्याच्या कथित प्रयत्नांवरही फिर्यादीने प्रकाश टाकला आहे.
तसेच आरोपी दर्शनच्या घरातून ८३.६५ लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी उघड केले. हत्येपूर्वी आणि नंतर वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी त्याने वेगवेगळ्या नावाने नोंदणीकृत अनेक सिमकार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. जामीन मंजूर केल्याने महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊ शकतात यावर फिर्यादीने भर दिला.
दरम्यान, तुरुंग अधिकाऱ्यांना घरी जेवण, बेडिंग आणि पुस्तके आणण्याचे निर्देश देण्यासाठी दर्शनने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.