मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी दिल्लीत चर्चा
बंगळूर : कर्नाटकमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींबद्दल काँग्रेसच्या हायकमांडने मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर ताशेरे ओढले व समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील मुडा प्रकरण, वाल्मिकी घोटाळा आदी घटनामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. सिद्धरामय्या म्हणाले की, एसटी विकास महामंडळातील कथित घोटाळा आणि मुडाद्वारे जागा वाटपातील अनियमिततेमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नसली तरी विरोधी पक्षांनी त्यांना आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांच्यासोबत नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यांनी कर्नाटकातील भाजप आणि धजदच्या “सूडाच्या” राजकारणाबद्दल पक्षाच्या हायकमांडला माहिती दिली. “मी त्यांना सांगितले, की ते कथित मुडा आणि एसटी महामंडळ घोटाळ्यांवरून मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत.” हायकमांड आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिद्धरामय्या म्हणाले की, मी आणि शिवकुमार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात कर्नाटकावर झालेल्या अन्यायाविषयी पक्षाच्या नेत्यांना सांगितले.
दरम्यान, खर्गे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की त्यांनी आणि इतर नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि सामाजिक न्याय, गरीब आणि दलितांचे सक्षमीकरण आणि राज्याचा सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या धोरणांना बळकट करण्यासाठी पावले उचलण्यावर चर्चा केली.
“बसवण्णा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श आणि विचार कर्नाटकच्या विकासाचा पाया राहील,” असे त्यांनी पोस्ट केले. तत्पूर्वी या बैठकीदरम्यान खर्गे यांनी कर्नाटकातील अलीकडच्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती, ज्यांची राष्ट्रीय पातळीवरही चर्चा झाली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबाबत सादर केलेल्या अहवालाचाही खर्गे यांनी आढावा घेतला. त्यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दरम्यान, राहुल गांधी आणि खर्गे यांनी कर्नाटकातील काँग्रेसला भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी एसटी महामंडळ आणि मुडा प्रकरणातील कायदेशीर परिणामांवरही चर्चा केली.