कावेरी निवासस्थानी अल्पोपहार बैठक
बंगळूर : मुडा घोटाळाप्रकरणी अडचणीत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकमताने घेतला आहे.
मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवायला हवा, असे सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ उभे राहण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे अधिकृत निवासस्थान कावेरी येथे झालेल्या मंत्र्यांच्या न्याहारी बैठकीत घेण्यात आला.
मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कोणतीही भूमिका नाही. त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट रचला गेला हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदींसह सर्व मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अभय दिले.
राज्यपालांची नोटीस आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांना देण्यात येणाऱ्या उत्तरावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी कावेरी येथे सर्व मंत्र्यांची अल्पोपहाराच्या निमित्ताने बैठक बोलावली होती.
या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांचा सहभाग होता आणि मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ उभे राहण्यासाठी सर्वांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येते.
मुडा घोटाळ्याचा वापर मुख्यमंत्र्यांना राजकीयदृष्ट्या पायदळी तुडवण्यासाठी केला जात आहे. याविरोधात आपण सर्वजण लढू. तुम्ही कशावरूनही विचलित होऊ नका, असे काही मंत्र्यांनी बैठकीत सांगितले आणि बैठकीत सहभागी झालेल्या सर्वच मंत्र्यांनी याला सहमती दर्शवली.
आजच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुडा घोटाळा सर्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत या घोटाळ्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट करत सर्व मंत्र्यांनी आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने काहीही झाले तरी तुम्ही कायद्यासह सर्व मार्गाने लढा द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झालेल्या सर्व मुद्द्यांवर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.