हमी योजनेचे स्वरूप सुधारण्याची विनंती
बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी पाच हमी योजना रद्द होणार की कपात केली जाणार? या चर्चेदरम्यानच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. हमी योजनांच्या सुधारणा हा काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा विषय ठरला आहे. हमीयोजनांच्या सुधारणेच्या मुद्द्यावरून विरोधकांना नवे हत्यार मिळालेले दिसते.
मंत्री सतीश जारकीहोळी आणि के. एच. मुनियप्पा यांनी दिल्लीत हायकमांडच्या नेत्यांची भेट घेऊन राज्यातील हमी योजनांबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत वस्तुस्थितीची माहिती दिली. तसेच यावर कोणत्या प्रकारच्या मर्यादा घालाव्यात? यासंदर्भात त्यांनी चर्चाही केली आहे. त्यांना हमी योजनेचे स्वरूप सुधारण्याची विनंती केली. त्यावर राजकीय चर्चा होऊन वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत.
बुधवारी बंगळुरमध्ये याच मुद्द्यावर बोलताना जारकीहोळी म्हणाले, “मी हायकमांडला हमी योजना बंद करा, असे सांगितलेले नाही. त्याऐवजी काही मर्यादा घालाव्यात, अशी सूचना मी त्यांना केली. मी या विषयावर स्पष्ट आहे. राज्याच्या हमीयोजनावर लोक काय बोलतात ते मी फक्त बोललो. मी त्यांना फक्त आढावा करण्यास सांगितले.
या प्रकल्पाबाबत लोकांचे मत मी हायकमांडला सविस्तरपणे कळवले आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षाप्रमाणे मी कधीही हमीयोजना बंद करा असे म्हटले नाही. विरोधकांचे ऐकू नका. हमी योजना मर्यादित करून दहा हजार कोटींची बचत होऊ शकते, असे मत आपण व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले.
हमी योजनेवर काही मर्यादा घालण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. परंतु याबद्दल साधक-बाधक चर्चा होत आहेत. कपात झाल्यास काय परिणाम होतील याचाही विचार सरकार करत आहे.
हमी योजनांमधून आमदारांना निधीची कमतरता आहे, या युक्तिवादाला त्यांनी उत्तर दिले, आमदारांसाठी निधीची कमतरता कुठे आहे? बजेट बुक वाचा, सिद्धरामय्या यांनी जास्त अनुदान दिले आहे. बसवराज बोम्मई सरकारपेक्षा आमच्या सरकारने जास्त अनुदान दिले आहे, असे ते म्हणाले.
हमी योजनांच्या सुधारणेसाठी समाजकल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी विरोध व्यक्त केला. तसेच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हमी योजनेच्या सुधारणेचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट केले. परंतु सरकारने हमी योजना सुधारण्याचे प्रस्ताव नाकारले आहेत.
मंत्रिमंडळ बदल हायकमांडचा विषय
त्याच प्रसंगी त्यांनी मंत्रिमंडळ बदलाबाबत बोलताना हे सर्व मुख्यमंत्री आणि हायकमांडच्या पातळीवर असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळातून वगण्यात येणार कांही नावे मी टीव्हीवर पाहिली, मला आनंद झाला की आमचे नाव नाही. या टप्प्यावर आमची कोणतीही मागणी नसल्याचे ते म्हणाले.
शर्यतीत नाही
प्रदेश काँग्रेस (केपीसीसी) अध्यक्ष बदलायचा असेल तर त्याचा विभागवार व समुदायनुसार विचार करावा लागेल. शर्यतीत कोण आणणार हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही किंवा केपीसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीतही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.