सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश
बंगळूर : मुडा घोटाळा प्रकरणा संदर्भात, अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या अधिका-यांनी तपासाला आणखी गती दिली आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) सहा कर्मचाऱ्यांना समन्स बजावले आहे आणि त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सहा जणांना वेगवेगळ्या तारखा दिल्या असून त्यांनी बंगळूर येथील ईडीच्या विभागीय कचेरीत सुनावणीला हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती आहे.
सुनावणीदरम्यान समन्स बजावलेल्या सहा कर्मचाऱ्यांना या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर अधिकाऱ्यांना समन्स बजावून सुनावणीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) ५०:५० जमीन वाटप घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अडचणी येत आहेत आणि विविध एजन्सींनी तपास तीव्र केला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना जमीन वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) कार्यालय आणि म्हैसूर तालुका कार्यालयाची झडती घेतली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी देवराजूच्या केंगेरी निवासस्थानाचीही झडती घेतली, ज्याने पार्वती यांचा भाऊ मल्लिकार्जुन स्वामी यांना जमीन विकली होती.
तपास पूर्ण करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी जमीन वाटप घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती.