व्हिडिओ संवाद बैठकीत तयारीबाबत चर्चा
बंगळूर : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भव्य कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी केली असून, आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत शताब्दी सोहळ्याच्या तयारीबाबत चर्चा करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
आज रविवार सुट्टीचा दिवस असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची गृह कचेरी कृष्णा येथून व्हिडीओ संवादाद्वारे बैठक घेतली. भाजप महत्मा गांधी यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचविण्याचे काम करीत आहे. गांधीजी आणि काँग्रेसच्या वैचारिक भूमिकेबद्दल अपप्रचार करीत आहेत, असा यावेळी आरोप करण्यात आला.
घटनाबाह्य शक्तींची आंदोलने आणि हस्तक्षेप सर्वच स्तरातून दिसून येत आहे. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बेळगाव अधिवेशनाचे शताब्दी हे काँग्रेससाठी वैचारिक बांधिलकी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी व्यासपीठ असावे, अशी सूचना केली.
प्रत्येक आमदार व खासदाराने कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित पदयात्रा व व्यासपीठावरील कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. कार्यक्रमाला सर्वांनी खंबीरपणे साथ द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पक्षाच्या प्रत्येक नेत्याने सर्वांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची आखणी करावी, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. कोणतेही मतभेद बाजूला ठेवून पक्ष कार्यालयातच बैठका घ्याव्यात. नव्याने दाखल झालेल्या नेते व कार्यकर्त्यांशी पक्षात कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रम भव्य व यशस्वी करण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.