बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आज सुवर्णसौध समोर भाजपाच्या वतीने निदर्शने केली गेली.
मूलभूत आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजावर सरकारकडून हल्ला करवण्यात आल्याचा आरोप करत, आज सुवर्ण सौध समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपाचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या आमदारांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सुवर्णसौधमध्ये अनुभव मंडप आणि बसवन्ना यांच्या तैलचित्राचे उद्घाटन करत असताना ‘दया’ आणि ‘धर्म’ या शब्दांचा उल्लेख करत होते, मात्र तेच सरकार पंचमसाली आंदोलकांवर लाठी चार्ज करीत आहे. आरक्षण मागणाऱ्यांवर लाठीचा उपयोग केला आहे. त्यांनी बसवन्ना समाजाचा अपमान केला आहे. स्वतःच कधी ट्रॅक्टर आणू नये कधी कार आणू नये, असे निर्बंध घालून सरकारने आंदोलकांवर हल्ला केला. हे सर्व पाहता हा एक पूर्वनियोजित हल्ला असल्याचे स्पष्ट होते. आरक्षणासाठी लढणाऱ्यांना ठेचून काढण्यासाठी सरकार तयार आहे. आंदोलकांवर हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर.अशोक यांनी केली. विधान परिषद विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंचमसाली समाजाचा अपमान केला आहे आणि त्यांना तत्काळ माफी मागावी लागेल, असे ते म्हणाले. निदर्शनांमध्ये आमदार सुनील कुमार, अश्वथ नारायण, एस. आर. विश्वनाथ, भारत शेट्टी, प्रभू चौहान आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta