
बंगळूर : राज्यात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला असून त्यात एका मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शिग्गावजवळील तडसा क्रॉस येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारने नियंत्रण गमावले, रस्ता दुभाजकावरुन पलिकडे उडी मारली आणि हुबळीहून बंगळुरच्या दिशेने येणाऱ्या मोटारला धडकली आणि थिम्मापूरजवळ हा अपघात झाला.
या धडकेमुळे एका मोटारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या दोघांचा हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात चालकासह अन्य गाडीतील इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
चंद्रम (५९, रा. चामराजपेट, बंगळुर) आणि त्यांची मुलगी मीना (३८), जावई महेश कुमार (४१) आणि राजराजेश्वरी नगर येथे राहणारा नातू धनवीर (११) अशी मृतांची नावे आहेत.
या अपघातात एका मोटारचा पूर्ण चक्काचूर झाला असून दुसऱ्या मोटारच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. उशिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला, गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta