मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मकरसंक्रांतीची भेट
बंगळूर : मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना बंपर भेट दिली आहे. आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे विकास अनुदान जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी बेळगाव येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना अनुदान वाटप न केल्याबद्दल भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत आमदारांना अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. आम्ही सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी दहा कोटींचे अनुदान दिले आहे. भाजप आणि धजदच्या आमदारांनाही प्रत्येकी दहा कोटी अनुदान देत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
सोमवारी सायंकाळी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी निधी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, ‘मी रविवारीच फाइलवर सही केली आहे. केवळ काँग्रेस आमदारांनाच नव्हे तर सर्व आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपयाचे अनुदान वाटपाची कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली, दहा कोटी रुपये अनुदानातून कोणतीही विकास कामे करता येत नाहीत. वाढीव निधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, सध्या दहा कोटी रुपये अनुदान वापरा. ज्यांना वाढीव अनुदान हवे आहे त्यांनी फेब्रुवारी महिन्यात प्रस्ताव सादर करावेत. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आहे.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी कॉंग्रेसच्या आमदार आणि मंत्र्यांना उघड वक्तव्ये करू नका, असा इशारा दिला. कोणताही संभ्रम असेल तर चार भिंतीत, पक्षाच्या चौकटीत चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली. सुरजेवाला यांच्या म्हणण्याला मुख्यमंत्र्यांनी दाद दिली. सर्व काही हायकमांडवर अवलंबून आहे. त्यानुसार प्रत्येकाने चालले पाहिजे, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta