प्रदेश काँग्रेसमधील मतभेद तीव्र
बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतरही काँग्रेस पक्षातील मतभेद संपलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी थेट केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात उघड वक्तव्य करत रिंगणात उतरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी अशी पक्ष हायकमांडकडे मागणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की केपीसीसीला पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज आहे. यासाठी आम्ही लवकरात लवकर नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची विनंती प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुरजेवाला यांना केली आहे.
मी स्वत:ला केपीसीसीचे अध्यक्षपद देण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, जे लोकप्रिय नेते निवडणुकीत उतरतील त्यांना अध्यक्ष करा. विद्यमान अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनाच कायम ठेवायचे असेल तर ते स्पष्ट करा आणि त्यांना कायम ठेवायचे की नाही हे हायकमांडला सांगू द्या. ते असावे की नसावे याबाबत संभ्रम असल्याने हा गोंधळ तात्काळ दूर करावा असे सुरजेवाला यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.
पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीबाबत हायकमांडने आमदारांचे मत जाणून घ्यावे, आमदारांचा पाठिंबा असणारा अध्यक्ष होण्यासाठी पूर्ण क्षमतेचा अध्यक्ष हवा. हे सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मत असल्याचे ते म्हणाले. हायकमांडने आमदारांच्या आग्रहानुसार सर्व आमदारांचे मत ऐकून नवीन अध्यक्षाची नियुक्ती करणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.
केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार अध्यक्षपदी कायम राहावे की दुसरे कोणीतरी अध्यक्षपदी रहावे याबाबत पक्षाच्या हायकमांड स्तरावर चर्चा झाली पाहिजे. हायकमांडने यावर लवकरच निर्णय घ्यावा, असा त्यांनी आग्रह धरला.
माझ्यासह सर्वांनी मंत्री झाल्यानंतर पक्षाला कमी वेळ दिला आहे. २०२३ मध्ये जी गती होती ती आता नाही, त्यामुळे नवा अध्यक्ष नेमावा, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जातील अशी टिपणी खुद्द एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीला ६ महिने होत आहेत, परंतु प्रदेशाध्यक्ष बदललेला नाही. आता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
दिल्ली भेटीचे औत्सुक्य
केपीसीसीसाठी नवीन अध्यक्षाची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी पुढील आठवड्यात दिल्लीत जाऊन यासंदर्भात हायकमांडकडे दाद मागणार आहेत. त्यांनी यापूर्वीच बंगळुरमध्ये राज्य काँग्रेसचे प्रभारी सुरजेवाला यांची भेट घेतली आहे आणि केपीसीसी अध्यक्ष बदलण्याची विनंती केली आहे. पुढील आठवड्यात ते हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्ष संघटित व्हावा, गटबाजीचे राजकारण संपूष्टात यावे या उद्देशाने विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली होती. परंतु या बैठकीनंतर काँग्रेसमधील मतभेदाची दरी दूर न दोता पुन्हा वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta