बेंगळुरू : कर्ज परतफेडीदरम्यान मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जास्त त्रास दिल्यास कारवाई करण्याचा कडक इशारा महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज परतफेडीवेळी होत असलेल्या छळा संदर्भात आज महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री कृष्णभैरेगौडा म्हणाले, मायक्रोफायनान्स कर्जाची परतफेड करत असताना काही वित्तपुरवठा करणारे अन्यायकारक उपाय अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या आठवड्यात मायक्रो फायनान्स प्रतिनिधींची बैठक बोलावून आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना द्याव्यात. नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्या कर्ज देण्यास तत्पर असतात. परतफेडीची क्षमता तपासून कर्ज दिले पाहिजे. एका व्यक्तीला २ लाखांपेक्षा जास्त कर्ज देऊ नये, अशी आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. याचे पालन केले पाहिजे. ग्राहक कर्जात अडकू नयेत. बेजबाबदार कर्ज देण्यावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.