
बंगळूर : आमदार बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले आळंद मतदारसंघाचे आमदार बी. आर. पाटील यांनी आज आपल्या सल्लागार पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द केला.
मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या बी.आर.पाटील यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यावेळी त्यांच्या समजुतीवरून त्यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिल्याने विविध अन्वयार्थ लावले जात आहेत.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही बी. आर. पाटील यांनी मतदारसंघांच्या विकासासाठी अनुदान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी आता अचानक सल्लागारपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सिद्धरामय्या सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांना कोणताही दर्जा दिला जात नसल्याबद्दल काही ज्येष्ठ आमदार नाराज होते. आर. व्ही. देशपांडे, बसवराज रायरेड्डी, बी. आर. पाटील असंतुष्ट होते. त्यामुळे अशा कांही आमदारांना विशेष पदे देण्यात आली. बसवराज रायरेड्डी यांची मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार, बी. आर. पाटील यांची मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अध्यक्षपदी आर. व्ही. देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता बी. आर. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta