
बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनेअंतर्गत, अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रकमेऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता लाभार्थ्यांना पाच किलो ऐवजी प्रत्येकी दहा किलो तांदुळ मिळणार आहे.
विधान सौधमध्ये या संदर्भात बोलताना अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, केंद्र सरकारकडून तांदळाची उपलब्धता असल्याने, त्यांनी ओएमएसएस योजनेअंतर्गत अतिरिक्त ५ किलो तांदूळ खरेदी करण्याचा आणि या महिन्यापासूनच तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेसने अन्नभाग्य योजनेअंतर्गत बीपीएल कार्ड लाभार्थ्यांना १० किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. पण केंद्र सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने राज्य सरकारने अन्नभाग्य निधी देण्याची घोषणा केली. आवश्यक प्रमाणात तांदूळ उपलब्ध नसल्याने, लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ देण्यात आला आणि उर्वरित ५ किलो तांदूळाऐवजी त्याची रक्कम १७० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.
‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत काही अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांसाठी अतिरिक्त ५ किलो तांदूळाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
बंगळुरसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जानेवारीमध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तथापि, अनेक लोकांना तीन महिन्यांपासून डीबीटीद्वारे पैसे मिळालेले नाहीत. अन्न रेशनच्या पैशांची वाट पाहत थकलेल्या अनेक महिला लाभार्थ्यांनी अन्न विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकूण १५३७६४७३ रेशनकार्ड आहेत आणि ५३६७३२४२ सदस्य आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
नवीन रेशन कार्ड
राज्यात २०२३-२०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी एकूण २,३०,५४९ नवीन रेशन कार्डसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी १,५८,००० कार्ड वितरित करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, ६५,४३७ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta