बंगळूर : कोडगू जिल्ह्यातील पोन्नमपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका जोडप्याची आणि त्याच कुटुंबातील आई आणि मुलीची प्राणघातक शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.
मृतांची ओळख पटली असून बोगुरू गावातील करिया (वय ७५), गौरी (वय ७०), या जोडप्यासह नागी (वय ३०) आणि तिची मुलगी कावेरी (वय ५) अशी त्यांची नावे आहेत. आज सकाळी घरात भांडण झाले आणि या चौघांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.
गिरीश नावाची व्यक्ती ही हत्या करून पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आहे. बातमी मिळताच एसपी रामराजन आणि पोन्नमपेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास केला.
स्थानिकांकडूनही पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. कौटुंबिक वाद किंवा अनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही भयानक हत्या झाली असावी असा संशय आहे. संशयिताला पकडल्यानंतर घटनेचे नेमके कारण कळेल.