
यत्नाळ गटाची बंगळूरात महत्वपूर्ण बैठक; संघर्ष वाढण्याची चिन्हे
बंगळूर : भाजपचे हकालपट्टी केलेले आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आज भाजपमधील असंतुष्ट गटाची बैठक घेऊन उत्सुकता निर्माण केली आहे. वरिष्ठांनी स्पष्टपणे निर्देश दिले होते की यत्नाळसोबत बैठका घेणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तरीही, असंतुष्टांनी बैठक घेऊन वरिष्ठांना थेट आव्हान दिले आहे.
हकालपट्टी केलेले आमदार यत्नाळ, रमेश जारकीहोळी, जी. एम. सिद्धेश्वर, कुमार बंगारप्पा, प्रतापसिंह, एन.आर. संतोष आणि कारणे दाखवा नोटीस मिळालेले आमदार बी. पी. हरीश बैठकीत सहभागी झाले होते. माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
तत्पूर्वी, ते हैदराबादहून विमानाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आणि थेट माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्या निवासस्थानी गेले. या आधी सदाशिवनगर येथील माजी आमदार कुमार बंगारप्पा यांच्या निवासस्थानी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु ‘यत्नाळ’ टीमने अचानक बैठकीचे ठिकाण बदलल्याने औत्सुक्य निर्णा झाले आहे.
माध्यमांना कोणचताच प्रतिसाद न देता यत्नाळ यांनी सिद्धेश्वर यांच्या यूबी सिटी अपार्टमेंटमधील निवासस्थानी गुप्त बैठक घेतली. बैठकीत आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत चर्चा झाली, तसेच विविध नेत्यांनी पुढे कोणती पावले उचलावीत आणि पक्षाच्या हितासाठी कोणते निर्णय घ्यावेत यावर चर्चा झाली.
बैठकीत वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांना भाजपचे हकालपट्टी करण्यात आलेले आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करण्याबाबतही चर्चा झाली. वरिष्ठ नेत्यांना भेटायचे की पत्राद्वारे विनंती करायची यावरही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
आजच्या बैठकीत यत्नाळ यांची हकालपट्टी रद्द करण्यासाठी संघ परिवारातील नेत्यांमार्फत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. गुढीपाडव्यानंतर दिल्लीला जाऊन नेत्यांना भेटण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
विजयेंद्र व्यतिरिक्त इतर कोणाला भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची त्यांची जुनी मागणी पुन्हा एकदा नेत्यांसमोर ठेवण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे समजते.
भाजपमध्ये मतभेद निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या यत्नाळ यांना हद्दपार केल्यानंतरही मतभेद करणारे नेते बैठकीला आवर्जून उपस्थित होते हे विशेष आहे. या बैठकीमुळे विजयेंद्र यांच्या समर्थकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे आणि आजच्या बैठकीची माहिती हायकमांडला पाठवण्यात आली असल्याचे समजते.
या सर्व घडामोडी होऊनही असंतुष्ट नेते नेते आपला संघर्ष थांबविण्यास तयार नाहीत. त्यामुळे येत्या काळात भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta