बंगळूरू : बंगळुरूच्या नागवाडा येथील परिसरात शुक्रवारी एका ३५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित सदर व्यक्तीने आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची नावे लिहिली आहेत. आत्महत्या करणारे भाजपाचे पदाधिकारी विनय सोमय्या असल्याचे सांगितले जाते. स्थानिक काँग्रेस नेते तनिरा महेना, आमदार एएस पोन्नन्ना आणि इतर काही लोकांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. खोट्या खटल्यात अडकविल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील सोमवारपेठ येथ राहणारे विनय सोमय्या हे “कोडागीना समस्येगालु” या व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन होते. या ग्रुपवर काँग्रेसचे आमदार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधी सल्लागार एएस पोन्नन्ना यांच्याविरुद्ध एक वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये पोन्नन्ना यांचा पारंपरिक कोडवा वेषातला फोटो शौचालयाबाहेर लावल्याचे दाखविण्यात आले होते. तसेच फोटोसह काही आक्षेपार्ह मजकूरही लिहिला होता.
ही घटना समोर आल्यानंतर सदर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोस्ट शेअर करणारा आणि ग्रुपचे ॲडमिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विनय यांना आरोपी क्र. ३ करण्यात आले. आधी त्यांना अटक करून नंतर जामीनावर सोडले गेले. न्यायालयाने या खटल्यात स्थगिती दिल्यानंतरही पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यांचा छळ सुरू ठेवला.
विनय यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले की, मागच्या दोन महिन्यांपासून मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवून आहे. एका व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपवर काहीतरी पोस्ट टाकली. ती पोस्ट टाकण्याच्या फक्त पाच दिवस आधी मला ग्रुपचे ॲडमिन केले गेले होते. तरीही सदर पोस्टसाठी मला जबाबदार धरण्यात आले. माझ्याविरोधात राजकीयदृष्ट्या प्रेरित एफआयआर दाखल करण्यात आला. मला समाजकंटक म्हणून घोषित करण्यात आले. तनिरा महेना यांनी राजकीय द्वेषापोटी माझे आयुष्य उध्वस्त केले. माझ्या मृत्यूसाठी त्याचा थेट संबंध आहे.
या चिठ्ठीत पुढे म्हटले की, तनिरा महेना यांनी मला बदनाम करण्यासाठी लिहिलेला एक लेख सोशल मीडियावर वारंवार शेअर केला जात आहे. उच्च न्यायालयाने मला जामीन दिल्यानंतर आणि सदर एफआयआर रद्द केल्यानंतरही आम्हाला गुन्हेगार मानने कितपत योग्य आहे? मला माझ्या सूत्रांकडून कळले की, मला गुंड ठरविण्याचा कट रचला जात आहे.
या चिठ्ठीच्या शेवटी विनय सोमय्या यांनी कर्नाटक भाजपाला आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची आई, पत्नी आणि मुलीची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या काळजी घ्यावी. तसेच हे पाऊल उचलल्याबद्दल त्यांना माफ करावे.