बेंगळुर : पालकांच्या मागणीनंतर कर्नाटक शासनाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी वयोमर्यादेत तात्पुरती सवलत दिली आहे. शिक्षण खात्याने पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण होण्याची अट घातली होती. पण आता शिथिलता आणून ती आता 5 वर्षे 6 महिने वय पूर्ण आणि युकेजी (UKG) पूर्ण केलेली मुले यावर्षी इयत्ता पहिलीसाठी पात्र ठरणार आहेत.
शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी समग्र शिक्षण कर्नाटक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
वयोमर्यादेची ही सवलत फक्त यंदा एकदाच लागू राहणार आहे. पुढील वर्षीपासून म्हणजेच 2026-27 सालासाठी इयत्ता 1 लीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 1 जूनपर्यंत किमान 6 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असेल.
राज्य शिक्षण धोरण समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, तो राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व शाळांवर लागू होईल.
जुलै 2022 मध्ये शासनाने इयत्ता 1 लीच्या प्रवेशासाठी आवश्यक वय 5 वर्षे 5 महिन्यावरून 6 वर्षांपर्यंत वाढवले होते. हा बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शिक्षणाचा हक्क कायदा यांच्या अनुषंगाने करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 21 राज्यांनी ही सुधारणा लागू केली होती. मात्र, त्यावरून पालक व शाळांकडून तीव्र विरोध झाला होता कारण त्या वर्षीचे प्रवेश आधीच पूर्ण झाले होते.
नंतर नोव्हेंबर 2022 मध्ये शासनाने नव्याने परिपत्रक जारी करून ही अट 2025-26 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या वेळेस प्री-केजी, एलकेजी आणि युकेजीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास वेळ मिळाला. मात्र, 2022-23 मध्ये नर्सरीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वय नव्या नियमांनुसार अपूर्ण ठरणार होते.
या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शासनाकडे सवलतीसाठी विनंती केली होती. त्यांनी सांगितले की, ही शैक्षणिक पुनरावृत्ती केवळ आर्थिक भार नव्हे तर मुलांसाठी मानसिक त्रासाचे कारण ठरत आहे. दुसरीकडे, कर्नाटकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन संघटनांनी या मागण्या मान्य करू नयेत, असे मत मांडले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने निर्णयाचा भार शिक्षण धोरण समितीवर सोपवला आणि अखेर पालकांच्या मागणीनुसार तात्पुरती सवलत देण्याचा निर्णय घेतला गेला.
Belgaum Varta Belgaum Varta