
बंगळुरु : आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. जल्लोषाच्या कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले होते. आता याविरोधात आरसीएसल अर्थात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेडने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आरसीएसलचे म्हणणे आहे. आम्ही विजयी जल्लोषाच्या कार्यक्रमासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री ठेवली होती. मात्र त्यासाठी नोंदणीची अट ठेवली होती. आम्हाला यात अडकवले जात आहे”, असे आरसीएसलचे म्हणणे आहे.
तर दुसऱ्या बाजूला चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क कंपनीनेही त्यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी न्यायलयाचे दार ठोठावले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पर्याप्त पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला, असे डीएनए एंटरटेनमेंट कंपनीचे म्हणणे आहे.
एफआयआरमध्ये नक्की काय?
कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन, आरसीबी आणि डीएनए कंपनीने परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रमांचा आयोजन केले. तसेच आरसीबीने कोणत्याही परवानगीशिवाय 4 जून रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि वेबसाईटवरुन चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी आमंत्रित केले, असा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta